नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जन-जागृत ; पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम !


 
 
 नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जन-जागृती; पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम !

तिरोडा ( प्रतिनिधी )
सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढला आहे, तेवढाच सायबर गुन्ह्यांचा आलेखही वेगाने उंचावत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यव्यापी विशेष सायबर सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज तिरोडा येथील गजबजलेल्या तिरोडा बस स्थानक परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी उपस्थित नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पॉम्पलेट वाटप आणि थेट संवाद
या जनजागृती मोहिमेदरम्यान तिरोडा पोलीस प्रशासनाच्या वतीने बस स्थानकावरील प्रवाशी, चालक-वाहक, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना सायबर सुरक्षेची माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचे (पॉम्पलेट्स) वाटप करण्यात आले. केवळ माहितीपत्रक न देता, उपस्थित पोलिसांच्या पथकाने नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी समजावून सांगितली.
'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन फसवणुकीबाबत विशेष मार्गदर्शन
आजकाल सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या चर्चेत असलेल्या 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) च्या नावाखाली होणारी भीती आणि फसवणूक, लॉटरी लागल्याचे आमिष, बँक खात्याची खोटी केवायसी (KYC) अपडेट करणे, पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि सोशल मीडियावरील फेक प्रोफाईल्स यांसारख्या विविध गंभीर प्रकारांची माहिती नागरिकांना अत्यंत सोप्या भाषेत देण्यात आली. "कोणतेही शासकीय अधिकारी किंवा पोलीस तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर 'अरेस्ट' किंवा डांबून ठेवू शकत नाहीत, अशा कोणत्याही धमक्यांना घाबरू नका," असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सायबर गुन्हा घडल्यास '१९३०' वर तात्काळ संपर्क साधा!
जर दुर्दैवाने कोणताही सायबर गुन्हा घडला किंवा पैशांची ऑनलाईन फसवणूक झाली, तर नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तात्काळ '१९३०' या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली. याशिवाय, सायबर गुन्ह्याची ऑनलाईन तक्रार अधिकृत पोर्टलवर कशी नोंदवावी, याचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. फसवणूक झाल्यानंतर पहिल्या काही तासांत (गोल्डन अवर) तक्रार केल्यास गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते, हे देखील पोलिसांनी अधोरेखित केले.
या मोहिमेमुळे तिरोडा बस स्थानकावरील शेकडो नागरिकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटले असून, पोलीस प्रशासनाच्या या सतर्कता आणि जनजागृतीपर मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. नागरिकांनीही कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नये आणि आपला ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखडे व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.