नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
नांदगाव खंडेश्वर :
तालुक्यात गेल्या ५२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. कापूस आणि तूर पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी सातत्यपूर्ण आणि आग्रही पाठपुरावा केला. त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे आणि विनंतीमुळे अखेर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नांदगाव खांडेश्वर तालुक्याचा दौरा करत दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान उपसभापती सचिन अहिर यांनी अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. "या कठीण काळात सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये," असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी सालोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.
नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत नांदगाव खंडेश्वर शहरात ६०ते ७० गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थेट मदत मिळवून दिल्याबद्दल मारोटकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर, जिल्हाध्यक्ष आशिष धर्मळे, प्रशांत वैद्य, पवन ठाकरे, प्रवीण दिधाते, यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी दाखवलेली तत्परता आणि शेतकऱ्यांसाठी थेट उपसभापतींना तालुक्यात आणण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांचे संपूर्ण परिसरातून स्वागत केले जात आहे.