फवारणी पंप वाटपावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी; नगरसेवक मारोटकर यांच्या पाठपुराव्यानंतर उपसभापतींचा दौरा संपन्न, मात्र लाभार्थ्यांच्या निवडीवरून उलट-सुलट चर्चा

फवारणी पंप वाटपावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी; नगरसेवक मारोटकर यांच्या पाठपुराव्यानंतर उपसभापतींचा दौरा संपन्न, मात्र लाभार्थ्यांच्या निवडीवरून उलट-सुलट चर्चा

नांदगाव खांडेश्वर :
तालुक्यात गेल्या ५२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. कापूस आणि तूर पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी सातत्यपूर्ण आणि आग्रही पाठपुरावा केला. त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे आणि विनंतीमुळे अखेर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नांदगाव खांडेश्वर तालुक्याचा दौरा करत दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान उपसभापती सचिन अहिर यांनी अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. "या कठीण काळात सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये," असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी सालोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.
मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ; लाभार्थ्यांमध्ये मुस्लीम शेतकऱ्यांची संख्या नसल्यासारखी असल्यामुळे उलट-सुलट चर्चा
या दौऱ्याच्या निमित्ताने नगरसेवक प्रकाश मारोटकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७० गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थेट मदत मिळवून दिल्याबद्दल मारोटकर यांचे एका बाजूला कौतुक होत असले, तरी दुसऱ्या बाजूला तालुक्यातील हजारो शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना केवळ ७० शेतकऱ्यांनाच फवारणी पंप मिळाल्याने इतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
त्यातच, या ७० लाभार्थ्यांच्या यादीत मुस्लीम शेतकऱ्यांची संख्या 'नसल्यासारखीच' (अतिशय नगण्य) असल्यामुळे आता या वाटपाच्या नियोजनावर परिसरात उलट-सुलट चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दुष्काळाचा फटका सर्व धर्मीय शेतकऱ्यांना सारखाच बसला असताना, वाटपामध्ये सर्व घटकांचा योग्य समन्वय का साधला गेला नाही, असा सूर काही स्तरातून उमटत असून यावरून नाराजी अधिकच गडद झाली आहे.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, महापौर प्राप्ती मारोटकर, जिल्हाध्यक्ष आशिष धर्मळे, प्रशांत वैद्य, पवन ठाकरे, प्रवीण दिधाते, बाळासाहेब यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी दाखवलेली तत्परता आणि शेतकऱ्यांसाठी थेट उपसभापतींना तालुक्यात आणण्याच्या प्रयत्नांचे स्वागत होत असले, तरी पंप वाटपातील मर्यादित संख्या आणि मुस्लीम शेतकऱ्यांच्या नगण्य सहभागामुळे निर्माण झालेली नाराजी सध्या तालुक्यात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे.