भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन !
नांदगाव खंडेश्वर :
येणाऱ्या काळात भासणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीने जनतेला सतर्क केले आहे. "पाणी आहे जीवन... त्याची बचत आहे भविष्य!" हा संदेश देत प्रशासनाने सर्व नागरिकांना पाणी अत्यंत जबाबदारीने आणि जपून वापरण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
वाढते तापमान आणि पाण्याचा अमर्याद वापर पाहता, प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय लावणे काळाची गरज बनली आहे. या मोहिमेअंतर्गत नगरपंचायतीने खालील महत्त्वाच्या ५ सूत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे:
• गळती असणारे नळ त्वरित दुरुस्त करा: घरात किंवा परिसरात कुठेही नळ गळत असल्यास तो तात्काळ दुरुस्त करून पाण्याची होणारी वाया जाणारी नासाडी थांबवा.
• गरजेपुरताच पाण्याचा वापर: अंघोळ, भांडी-कपडे किंवा इतर दैनंदिन कामांसाठी आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करा.
• वॉशिंग मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर: कपडे धुताना वॉशिंग मशीनचा वापर पूर्ण क्षमता (Full Load) झाल्यावरच करावा, जेणेकरून पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होईल.
• पावसाचे पाणी साठवा व वापरा: रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करून पावसाचे पाणी साठवा आणि त्याचा पुनर्वापर करा.
• झाडे लावा, पाणी जिरवा: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करा, ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
"पाणी वाचवा... जीवन वाचवा..." हा केवळ एक नारा नसून ते आपले कर्तव्य आहे. नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे की, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून आज केलेली बचतच आपले उद्याचे भविष्य सुरक्षित करू शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.