१८ टक्क्यांच्या चक्रव्यूहात नांदगाव खंडेश्वरमधील विकासकामे ; ८ टक्क्यांसाठी मोजमाप रोखल्याने ठेकेदारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता !

१८ टक्क्यांच्या चक्रव्यूहात नांदगाव खंडेश्वरमधील विकासकामे ; ८ टक्क्यांसाठी मोजमाप रोखल्याने ठेकेदारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता !

नांदगाव खंडेश्वर : 
स्थानिक नगरपंचायत/प्रशासकीय पातळीवर झालेल्या विकासकामांच्या बिलांवरून सध्या नांदगाव खंडेश्वर शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात झालेली विकास कामे आणि त्या बदल्यात द्याव्या लागणाऱ्या कथित '१८ टक्क्यांच्या' तडजोडीमुळे काही कंत्राटदार पुरते अडचणीत आले आहेत. या १८ टक्क्यांपैकी १० टक्क्यांचा हिशोब पूर्ण झाला असून, उर्वरित ८ टक्क्यांचा ताळमेळ अद्याप बसला नसल्याची चर्चा आहे. हा ८ टक्क्यांचा हिशोब जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत  झालेल्या कामांचे मोजमाप (Measurement) न करण्याच्या हालचालींना वेग आल्याने, यंदा काही ठेकेदारांची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे '१० विरुद्ध ८' टक्क्यांचा वाद ?

नांदगाव खंडेश्वर शहरात विविध वॉर्डांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. नियमानुसार काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे मोजमाप करून अंतिम बिल काढणे अपेक्षित असते. मात्र, सध्या शहरात वेगळीच चर्चा रंगली आहे. कथित १८ टक्क्यांच्या टक्केवारीपैकी १० टक्क्यांचे नियोजन मार्गी लागले आहे, परंतु उर्वरित ८ टक्के कुणाला आणि कसे द्यायचे, यावर अडसर निर्माण झाला आहे. सांगीतलेली काही किरकोळ कामे व हा ८ टक्क्यांचा हिशोब चुकता होत नाही, तोपर्यंत मोजमाप पुस्तिकेत (MB Book) नोंदीच करायच्या नाहीत, असा अलिखित नियम काही घटकांनी लावून धरल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनावरील 'अदृश्य' दबावाची चर्चा

काम पूर्ण झाले असतानाही मोजमाप का रखडले ? असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकृतरीत्या प्रशासनाने मोजमाप रोखल्याची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र, पडद्यामागून प्रशासनावर प्रचंड राजकीय किंवा वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. जोपर्यंत ८ टक्क्यांची 'अडचण' दूर होत नाही, तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा काही ठेकेदारांचे कामांचे मोजमाप करण्यास कचरत असल्याचे चित्र आहे.

मोजमापच नाही, तर बिल कसे निघणार ?

ठेकेदारांनी स्वतःचे भांडवल गुंतवून, बाजारपेठेतून उधारीवर साहित्य आणून आणि मजुरांची देणी देऊन कामे वेळेत पूर्ण केली. आता दिवाळी तोंडावर आली आहे. जर कामाचे अधिकृत मोजमापच झाले नाही, तर अंतिम बिल (Bill) तयार होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. बिल मंजूर न झाल्यास ठेकेदारांना बँकेचे हप्ते, साहित्याचे पैसे आणि मजुरांचे खायचे काय ? हा मोठा प्रश्न सतावत आहे.

ठेकेदारांमध्ये चिंतेचे वातावरण

"आम्ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण केली. आता हक्काचे पैसे मिळण्याच्या वेळी टक्केवारीच्या गणितात आमचे मोजमाप अडकवून ठेवले जात आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया काही कंत्राटदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. वर्षभरातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना, हातात पैसा न आल्यास कुटुंब आणि मजुरांची दिवाळी कशी साजरी करायची, या चिंतेने ठेकेदारांना ग्रासले आहे.
आता या '१८ टक्क्यांच्या' चक्रव्यूहातून नांदगाव खंडेश्वरचे प्रशासन कंत्राटदारांना बाहेर काढणार की टक्केवारीच्या दबावापुढे झुकून कंत्राटदारांची दिवाळी खरोखरच अंधारात ढकलणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.