नांदगांव खंडेश्वर येथील बुधवारा चौकात अपघाताची मालिका सुरूच ; गतिरोधक ( स्पीड ब्रेक र) बसवण्याची 'एमआयएम'ची प्रशासनाकडे आर्त हाक

नांदगांव खंडेश्वर येथील बुधवारा चौकात अपघाताची मालिका सुरूच ; गतिरोधक ( स्पीड ब्रेक र) बसवण्याची 'एमआयएम'ची प्रशासनाकडे आर्त हाक

नांदगांव खंडेश्वर :
तालुक्यातील मुख्य केंद्र असलेल्या बुधवारा चौकात वाहनांच्या वाढत्या वेगामुळे मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) नांदगांव खंडेश्वरचे शहराध्यक्ष मोहम्मद तौसीफ (सोनू) यांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनम्र आवाहन करत येथे तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारा चौकातून दिवस-रात्र वेगाने वाहने धावत असतात. 
त्यामुळे पादचारी आणि इतर वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "येथे मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांना गतिरोधक बसवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
"अपघातानंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा आधीच सुरक्षा करा !"
याविषयी बोलताना एमआयएमचे शहराध्यक्ष मोहम्मद तौसीफ यांनी सांगितले की, "गतिरोधकाचा उद्देश फक्त रस्त्याचा भाग उंच करणे नसून, वाहनांचा वेग कमी करून लोकांचे प्राण वाचवणे हा आहे. वाहने सुसाट वेगाने जात असल्यामुळे अचानक समोर येणाऱ्या व्यक्तीला वाचवणे चालकाला कठीण जाते. यामुळे एखादी छोटीशी चूक एखाद्या कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जाऊ शकते."
हा प्रश्न कोणत्याही राजकीय हेतूने किंवा अधिकाऱ्यांशी असलेल्या वैयक्तिक वादातून नसून, पूर्णपणे जनतेच्या सुरक्षेचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करून बुधवारा चौकात तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी AIMIM नांदगांव खंडेश्वर तर्फे करण्यात आली आहे. 'सडक सुरक्षित असेल, तरच प्रवास सुरक्षित होईल' असे म्हणत जनतेच्या सुरक्षेला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.