अमरावतीतून बेपत्ता झालेला ५ वर्षीय कलश सुखरूप सापडला ; राजापेठ पोलीस आणि क्राईम ब्रांचची कौतुकास्पद कामगिरी !

अमरावतीतून बेपत्ता झालेला ५ वर्षीय कलश सुखरूप सापडला; राजापेठ पोलीस आणि क्राईम ब्रांचची कौतुकास्पद कामगिरी !

अमरावती :
अमरावती शहरातून गरबा खेळताना बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय कलश नावाच्या लहान मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. राजापेठ पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या पथकाने अत्यंत वेगाने चक्रे फिरवत या बालकाला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून सुखरूप शोधून काढले आहे. कलश सुखरूप मिळाल्याने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गरबा खेळताना झाला होता बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात गरबा खेळत असताना कलश अचानक बेपत्ता झाला होता. लहानगा मुलगा अचानक गायब झाल्याने पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अमरावतीच्या राजापेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) तातडीने शोधमोहीम सुरू केली.
गोंदियात लागला शोध
तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना कलश गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी वेळ न गमावता आमगाव गाठले आणि कलशला आपल्या ताब्यात घेतले.
पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
पोलीस पथकाने कलशला सुखरूप अमरावतीत आणून अधिकृत प्रक्रियेनंतर त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. आपल्या पोटच्या गोळ्याला सुखरूप पाहून पालकांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अमरावती पोलिसांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.