लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध ; घरोघरी पाईपलाईन
नेण्याचे काम सद्यस्थितीत बंद, जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थगितीची मागणी
नांदगाव खंडेश्वर :
शहरात मुख्य रस्ते खोदून आधीच दुरवस्था करणाऱ्या 'अदाणी टोटल गॅस लिमिटेड' (ATGL) कंपनीने आता थेट दाट लोकवस्तीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये आणि घरांच्या भिंतीवरून पीएनजी (PNG) गॅस पाईपलाईन नेण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता, शहरातील सत्तेतील ७ ते ८ नगरसेवकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कामाला जोरदार विरोध दर्शवला आहे. नागरिकांचा वाढता असंतोष आणि लोकप्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता, कंपनीला सद्यस्थितीत घरोघरी पाईपलाईनचे काम तात्काळ बंद करावे लागले आहे.

या गंभीर समस्येवर नगर पंचायत प्रशासन, अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि अदानी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना अधिकृत निवेदन पाठवून काम कायमचे थांबवण्याची, सुरक्षा ऑडिट करण्याची आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात उपस्थित केलेले ५ मुख्य आक्षेप आणि मागण्या:
- दुष्काळात पाणी पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका: तालुक्यात आधीच भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. गल्लीबोळात पुन्हा खोदकाम केल्यास पिण्याच्या पाण्याच्या मुख्य व जुन्या वाहिन्या (Water Pipelines) फुटून पाणीटंचाई अधिक उग्र होण्याचा १००% धोका आहे.
- सुरक्षेची १००% लेखी हमी आवश्यक : गॅस हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. दाट लोकवस्तीत गळती किंवा आग लागल्यास स्थानिक पातळीवर कोणतीही आपत्कालीन यंत्रणा किंवा तात्काळ अग्निशामक सज्जता नाही. त्यामुळे प्रशासनाने व कंपनीने प्रत्येक घराच्या सुरक्षेची लेखी कायदेशीर हमी दिल्याशिवाय काम सुरू करू नये.
- बँक गॅरंटी जप्त करण्याची मागणी : यापूर्वी मुख्य वाहिनी टाकताना कंत्राटदाराने शहरात अवाढव्य खोदकाम करून रस्त्यांची चाळण केली, जी अजूनही पूर्ववत केलेली नाही. त्यामुळे कंपनीकडून मोठी 'बँक गॅरंटी' वसूल करावी, जेणेकरून रस्ते दुरुस्त न झाल्यास ती रक्कम जप्त करून रस्ते दुरुस्त करता येतील.
- आरोग्याचा प्रश्न आणि धुळीचे साम्राज्य : खोदकामामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून लहान मुले, महिला व वृद्धांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तसेच अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला आहे.
- त्रयस्थ संस्थेकडून (Third-Party Audit) सुरक्षा ऑडिट: नगर पंचायतीने यापूर्वी किरकोळ दंड करून कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता घरोघरी कनेक्शन देताना आय.आय.टी. (IIT) किंवा समतुल्य त्रयस्थ संस्थेकडून सुरक्षा व गुणवत्ता परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा.
...नाहीतर तीव्र जनआंदोलन छेडणार !
"नागरिकांच्या जिवाशी खेळणारा आणि शहराचे रस्ते उद्ध्वस्त करणारा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत जुने रस्ते पूर्ववत गुळगुळीत होत नाहीत आणि सुरक्षेची लेखी कायदेशीर हमी मिळत नाही, तोपर्यंत काम पुढे सरकू दिले जाणार नाही. प्रशासनाने जनभावनेचा आदर न केल्यास शहरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.