समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनाला अज्ञात वाहनाची धडक; दुरुस्तीचे काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनाला अज्ञात वाहनाची धडक; दुरुस्तीचे काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल 

नांदगाव खंडेश्वर:
समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर स्वतःच्या वाहनाच्या समोरील लाईटची दुरुस्ती करत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. रेहमान गुड्डु असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २१:०५ वाजेपासून ते ०६ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री २३:५२ वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील एच. पी. पेट्रोल पंपाजवळील चॅनल नंबर १३६ जवळ घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आणि आजूबाजूच्या लोकांकडे केलेल्या चौकशीवरून, मृत रेहमान गुड्डु हे त्यांच्या वाहनाच्या समोरील बाजूच्या लाईटचे दुरुस्तीचे काम करत उभे होते. त्याच वेळी एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन मागे (रिव्हर्स) घेतले. यादरम्यान पाठीमागे उभे असलेल्या रेहमान गुड्डु यांना या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत रेहमान गुड्डु हे दोन वाहनांच्या मध्ये दाबले गेले. त्यांच्या नाक आणि तोंडातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आनंद कवडुजी पिदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६ (१) आणि मोटार वाहन कायद्याच्या सहकलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.