घरफोडीची खोटी तक्रार करणाऱ्याचा अमरावती ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश; दारूच्या नशेत स्वतःच तोडले होते कुलूप

घरफोडीची खोटी तक्रार करणाऱ्याचा अमरावती ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश; दारूच्या नशेत स्वतःच तोडले होते कुलूप

अमरावती - 
घरफोडी झाल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका तक्रारदाराचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अमरावती ग्रामीण पोलिसांनी यशस्वी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. स्वतःच्याच घरात चोरी झाल्याचा बनाव रचणाऱ्या या इसमाचे बिंग पोलिसांनी तपासादरम्यान फोडले आहे.
काय आहे नेमकी घटना?
मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडपिंपरी येथील रहिवासी गणेश पुंडलिक चाहांदे (वय ५० वर्ष) यांनी पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ६,००० रुपये रोख आणि ३०,००० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्याचा दावा त्यांनी या तक्रारीत केला होता. या तक्रारीवरून मंगरुळ चव्हाळा पोलीस स्टेशन येथे अप.क्र. २४६/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तपासात उघड झालेली धक्कादायक माहिती:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. संशयित सचिन ज्ञानेश्वर काकडे (रा. खेडपिंपरी) याने दारूच्या नशेत स्वतःच घराचा कुलूपकोंडा तोडल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले.
पोलिसांनी कायदेशीर खाक्या दाखवताच घरात कोणतीही चोरी झाली नसल्याची कबुली दोघांनी दिली. तसेच, चोरीला गेल्याचे सांगण्यात आलेली सोन्याची पोत प्रत्यक्षात मुलीच्या घरी सुरक्षित ठेवलेली असल्याचे तक्रारदाराने मान्य केले.
अशा प्रकारे वैयक्तिक कारणातून किंवा दारूच्या नशेत केलेल्या कृत्याला लपवण्यासाठी घरफोडीची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार अमरावती पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
"खोेटी तक्रार देणे हा कायद्याने गुन्हा आहे! कायदा सर्वांसाठी समान!" असे आवाहन या कारवाईनंतर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.