नांदगाव खंडेश्वर शहरात PNG गॅस पाईपलाईनमुळे रस्त्यांची चाळण; तात्काळ दुरुस्ती व बँक गॅरंटीसाठी नगरसेविका आयेशा शेख जमिल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नांदगाव खंडेश्वर :
शहरात सध्या सुरू असलेल्या आणि नवीन प्रस्तावित असलेल्या PNG गॅस पाईपलाईनच्या कामामुळे संपूर्ण शहराची चाळण झाली असून रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, जुने रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत आणि पुढील कामासाठी संबंधित कंपनीकडून प्रशासनाने ठोस 'बँक गॅरंटी' घ्यावी, या मागणीसाठी नगरसेविका आयेशा शेख जमिल यांनी समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि अदाणी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) च्या वरिष्ठ व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनाची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
नागरिकांचा जीव टांगणीला; निवेदनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:
• रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व बँक गॅरंटी: गॅस पाईपलाईनच्या अस्ताव्यस्त खोदकामामुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले असून कंत्राटदार कंपनीने ते पूर्ववत करून दिलेले नाहीत. त्यामुळे नवीन काम सुरू करण्यापूर्वी जुन्या रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती व्हावी. तसेच, कंपनीने रस्ते दुरुस्त न केल्यास जप्त करता येईल अशी मोठी 'बँक गॅरंटी' प्रशासनाने कंपनीकडून लिहून घ्यावी.
• १००% सुरक्षेची हमी व आपत्कालीन यंत्रणा: दाट रहिवासी भागात काम करताना सुरक्षेची मानके पाळली जात नाहीत. भविष्यात गॅस गळती किंवा दुर्घटना झाल्यास स्थानिक पातळीवर कोणती आपत्कालीन यंत्रणा (Emergency Response System) सज्ज असेल? याची १००% लेखी सुरक्षेची हमी कंपनी व प्रशासनाने द्यावी.
• धुळीचे साम्राज्य व वाहतूक कोंडी: मागील कामाच्या वेळी कित्येक महिने प्रचंड धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडले, तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहतूक नियोजनाच्या (Traffic Management Plan) अभावामुळे अपघात वाढले आहेत. नवीन कामादरम्यान पाण्याचे फवारे मारणे आणि वाहतूक डायव्हर्शन करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
• थातुरमातुर कारवाईवर पडदा नको; त्रयस्थ ऑडिट व्हावे: यापूर्वी नगर पंचायत प्रशासनाने केवळ नावापुरता दंड ठोकून कंपनीच्या निष्काळजीपणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येक कामाचे त्रयस्थ पक्षाकडून (Third-Party Audit) गुणवत्ता परीक्षण व्हावे, अशी आग्रही मागणी नगरसेविकेने केली आहे.
"नांदगाव खंडेश्वर शहराच्या सुरक्षेचा आणि भविष्याचा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. जोपर्यंत जुने रस्ते गुळगुळीत होत नाहीत आणि पुढील खोदकामासाठी कंपनीकडून ठोस बँक गॅरंटीसह लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत नागरिकांचा रोष कायम राहील."
आयेशा शेख जमिल
(नगरसेविका, नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर)