अमरावती/चिखलदरा -
चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांचा दत्तक मुलगा असल्याचा दावा असलेल्या ६० वर्षीय वृद्धाविरुद्ध पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते रात्री १९:०० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २२:०९ वाजता गुन्हा नोंद क्रमांक २९०/२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बाथरूम साफ करत असताना विनयभंग
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी १५ वर्षांची पीडित अल्पवयीन मुलगी बाथरूम साफ करण्याचे काम करत होती. ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही संशयित आरोपी भाऊराव सपकाळ उर्फ भाऊसाहेब (वय ६० वर्षे, रा. चिखलदरा) हा तिच्या पाठीमागे गेला. त्याने पीडितेच्या पाठीवर आणि छातीवर हात फिरवून, तिची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासोबतच आरोपीने पीडितेच्या मैत्रिणीच्या अंगावर आणि पाठीवरही वाईट हेतूने हात फिरवल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल
या संवेदनशील प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी पीडितेच्या जबानी रिपोर्टवरून आरोपी भाऊराव सपकाळ विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३५१ (१/२) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याचे कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या उच्चपदस्थ आणि समाजकारणाशी जोडल्या गेलेल्या नावामुळे चिखलदरा परिसरात कमालीची शांतता आणि खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.