अमरावती -
शहरातील विमको मनोरा परिसरातील मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत तब्बल ९ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक केली असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान (ऑडिट) शाखेतील व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. लेखापरीक्षण अहवालानुसार, या शाखेतून सुमारे ५ किलो सोने आणि २ कोटी रुपयांची रोकड गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ९ कोटी रुपयांच्या या अपहारामुळे शाखेतील सुमारे १५० ग्राहकांना याचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत कंपनीतर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर शहर कोतवाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय याच्यासह इतर दोघांना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून शाखेतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी केली जात असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.