मोर्शी नगरपरिषदेतील अभियंत्यावर पैसे घेतल्याचा आरोप; व्हायरल व्हिडिओची निष्पक्ष चौकशी करण्याची नगरसेवक रवींद्र गुल्हाने यांची मागणी

मोर्शी नगरपरिषदेतील अभियंत्यावर पैसे घेतल्याचा आरोप; व्हायरल व्हिडिओची निष्पक्ष चौकशी करण्याची नगरसेवक रवींद्र गुल्हाने यांची मागणी

मोर्शी (प्रतिनिधी) -
मोर्शी नगरपरिषदेतील CLTC अभियंता श्री. आदर्श कैलास फंदे यांच्या संदर्भात पैसे घेतल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मोर्शी नगरपरिषदेचे नगरसेवक रवींद्र रामकृष्ण गुल्हाने यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना नगरसेवक रवींद्र गुल्हाने म्हणाले की, "मोर्शी नगरपरिषदेतील अभियंता आदर्श फंदे यांच्याबाबत पैसे घेतल्याचा आरोप असलेला व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून, नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचाराला कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही."
मात्र, केवळ व्हायरल व्हिडिओच्या आधारे कोणालाही थेट दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची सत्यता तपासून रीतसर प्रशासकीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
"मोर्शी नगरपरिषदेमध्ये पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार झाला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. नागरिकांचा विश्वास आणि नगरपरिषदेची प्रतिष्ठा कायम राखणे ही आमची जबाबदारी आहे," असेही गुल्हाने यांनी स्पष्ट केले.