समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ भीषण विचित्र अपघात; ट्रकने १९ कारना दिली धडक, ८ जण जखमी

समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ भीषण विचित्र अपघात; ट्रकने १९ कारना दिली धडक, ८ जण जखमी

सिंदखेड राजा - 
समृद्धी महामार्गावर वाकी शिवारात चॅनल क्र. ३२१.९०० मुंबई कॉरिडोअरवर आज सकाळी ११:२० वाजेच्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघात घडला. सिमेंट भरलेल्या एका कंटेनरला बाजूला करण्याचे काम सुरू असताना, पाठीमागून आलेल्या एका भरधाव ट्रकने थांबलेल्या वाहनांना जोरात धडक दिली. या साखळी अपघातात एकूण १९ कारचे मोठे नुकसान झाले असून, ८ प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची सविस्तर हकीकत:
महामार्गावरील चॅनल नंबर ३२१.९०० वर सिमेंटने भरलेला कंटेनर (क्र. MH 46 DC 0519) अपघातग्रस्त झाला होता. त्याला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रक (क्र. MH 40 BL 4911) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून समोर थांबलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की समोर उभी असलेली एक-एक वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात तब्बल १९ कार अपघातग्रस्त होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
८ जण जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू:
या अपघातामध्ये एकूण ८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सरला गजानन कंकाळ (वय ४२, रा. अकोला) यांच्या हाताला गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली आहे. तर इतर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
१) आराध्या मनीष काकडे (रा. पुणे)
२) मनीषा मनीष काकडे (रा. पुणे)
३) कृष्णा कपिल गौतम (रा. अकोला)
४) रिता अशोक मिश्रा (रा. पुणे)
५) मयंक अशोक मिश्रा (रा. पुणे)
६) स्वप्निल बाबाराव पांडव (रा. पुणे)
७) शुभम साळवे (रा. अकोला)
सर्व जखमींवर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर कारवाई:
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड आणि किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पी.एस.आय. अनिता इर्शिद, हेड कॉन्स्टेबल २२३२, पोलीस कॉन्स्टेबल २५३९, १९०२, २७३१, २५३६ आणि एम.एस.एफ. चे ५ जवान यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
दुपारी १६:०० वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून कारवाई पूर्ण केली. अपघातग्रस्त सर्व १९ कार सिंदखेड राजा टोलनाक्यावर लावण्यात आल्या आहेत, तर अपघात करणारा ट्रक क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आहे. महामार्गावर योग्य बॅरिकेडिंग करण्यात आले असून सध्या वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे ए.पी.आय. राहुल पाटील यांनी दिली आहे.